0 बाबरचा मुलगा हुमायूँ



बाबर, हुमायूँ आणि अकबर यांचा पिअर्स साबणाशी काय संबंध? मी साबणाचा खोकाही तपासून पाहिला. काहीच माहिती आढळली नाही. ह्या जाहिरातीसाठी ए. आर. रेहमानच्या गाण्याची चाल वापरायचीच होती, तर ’दिल है छोटासा...’ काय वाईट होतं? तरी नशीब! अजून मराठी माणसाने ’जाहिरातीमधे बाबरचा मुलगा हुमायूँ... च्या ऐवजी शहाजीचा मुलगा शिवाजी, शिवाजीचा मुलगा संभाजी... असे शब्द घाला’ असं सांगितलं नाही.

पुढे वाचा;...

32 प्रियाराधन



असे दुर्मिळ क्षण कॅमे-यात बंदिस्त करता आले की आपल्याकडे कॅमेरा असल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.

पुढे वाचा;...

7 आयडीयाची कल्पना

घरात नवीन लाकडी कपाट आल्यावर आधीची दोन जुनी लोखंडी कपाटं बाहेर कशी काढायची हा मोठ्ठाच प्रश्न होता. चार माणसांना एक रिकामं कपाट उचलता आलं, तरी ते दरवाज्यामधून बाहेर काढताना कुठेतरी भिंतींना ओरखडे येतील, दरवाजाच्या लाकडाचा टवका उडेल अश्या निरनिराळ्या भितीदायक शक्यता मनात गर्दी करून होत्या. पण काय आश्चर्य! त्या चौघा मजूरांनी दोन कपाटं हा हा म्हणता बाहेर नेली, तीही न उचलता!

कपाट रिकामं केलेलं होतं, त्यामुळे आत वजन असण्याचा प्रश्न नव्हता. रिकाम्या कपाटाचंच काय ते वजन. त्या चार जणांनी रिकामं कपाट एकदा उजच्या बाजूने, एकदा डाव्या बाजूने कलतं करून कपाटाच्या पायांखाली एक चादर अंथरली आणि चादरीची टोकं हातात धरून त्यांनी ते कपाट ओढत अगदी सहज बाहेर नेऊन ठेवलं. दुसरंही कपाट अशा रितीने बाहेर गेलं तरी माझ्या तोंडाचा वासलेला आ काही मिटायला तयार नव्हता. जवळ-जवळ दहा ते पंधरा मिनिटांचं काम त्यांनी अक्षरश: पाच मिनिटांत केलं होतं. ही आयडीयाची कल्पना मला फारच आवडली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते म्हणतात, ती अशी.

पुढे वाचा;...

10 नाना परिमळ

सुवासिक साबण, अगरबत्ती, टाल्कम पावडर, परफ्युम या गोष्टी रोजच्या जीवनक्रमात इतक्या आवश्यक आहेत की सुगंध आपल्या आयुष्यातून अगदी हद्दपार करायचा म्हटला तरी ते शक्य नाहीये. काही लोकांना तर या सुवासाचं इतकं वेड असतं की त्यांच्या घरात पाच ते आठ निरनिराळे सुगंध असलेल्या अत्तराच्या आकर्षक बाटल्या तुम्हाला सापडतील. बाजारातही असे निरनिराळे सुगंध प्रचंड प्रमाणात विकले जातात. तुम्ही कुठच्याही मॉलमधे जा. प्रवेश केल्यावर अगदी सुरूवातीलाच तुम्हाला परफ्युमचा स्टॉल दिसेल. तिथे उभे असलेले सेल्समन ’सर, मॅडम..’ अशा हाका मारून आपल्याला परफ्युम पहाण्यासाठी बोलावत असतात. फेरारी, करेरा, बेनेटन असे कितीतरी निरनिराळे परफ्युम ब्रॅन्डस बाजारात उपलब्ध आहेत.

ह्या परफ्युम्समधेहि स्त्रीने वापरायचे व पुरूषाने वापरायचे परफ्युम निरनिराळे असतात. एकमेकांना आकर्षित करण्यासाठी असे स्पेशल परफ्युम वापरले जातात म्हणे. खरं खोटं वापरणाराच जाणे. मध्यंतरी एक प्रसिद्ध परफ्युम वापरणा-या ग्राहकाने सुगंध विक्रेत्या कंपनीवरच फसवणुकीची केस दाखल केली होती. त्याचं म्हणणं होतं की, "हा परफ्युम वापरल्यावर मुली तुम्हाला सहज पटतील, अशा आशयाची जी कंपनीची जाहिरात होती, ती पाहून मी परफ्युम खरेदी केला. पण प्रत्यक्षात मला मुली पटण्याऐवजी, दोन-तीन मुलींनीच मला पटकलं." असे काही तुरळक अपवाद सोडले, तरी काही सुगंध असे असतात की जे वापरल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटू शकतं. उत्साह वाटू शकतो. पूर्वी अत्तराचा फाया कानात ठेवण्याची सवय काही लोकांना होती. अजूनही लग्नाच्या दिवशी नवरदेवाला अत्तराचा फाया कानात ठेवण्यासाठी दिला जातो.

परफ्युमचा शिडकावा कपड्यावर नाही, तर आपल्या शरिरावर करायचा असतो असं म्हणतात. काहींना विशिष्ट सुगंधाची अॅलर्जीही असू शकते. एखादा नवीन परफ्युम वापरल्यावर शिंका येणे, अंगावर पुरळ उठणं किंवा घेरी आल्यासारखं वाटणं असे प्रकार झाले, तर ताबडतोब तो परफ्युम वापरणं थांबवायला हवं. परफ्युम विकत घ्यायला जाताना कधीही अंगावर परफ्युमचा शिडकावा न करताच जावं. कागदाच्या पट्टीवर एका टोकाला हलकेच अत्तराचा शिडकावा करून ती पट्टी हवेत दोन-तीनदा हलवायची आणि नाकाजवळ फिरवायची. बाटलीतला सुगंध नेमका कसा आहे, हे पडताळून पहाण्याची ही एक कसोटी. पण अमूक परफ्यूम आपल्याला सूट होतो की नाही, म्हणजे आपल्याला चालतो की नाही हे जर पडताळून पहायचं असेल, तर तो परफ्यूम आपल्या मनगटाच्या आतल्या बाजूला लावावा आणि काही क्षण थांबावं. मग नाकापासून मनगटाचा तो भाग किमान एक इंच लांब ठेवून तो सुवास घेऊन पहावा. आपल्या शरिराचा गंध आणि मनगटाला लावलेला सुगंध यांचं मिश्रण होऊन एक वेगळाच सुवास आपल्याला अनुभवता येतो. हा सुवास जर आवडला, त्याने काही त्रास झाला नाही, तर तो परफ्युम घेण्यास काहीच हरकत नाही, असं समजावं.

काही लोक परफ्युम किंवा अत्तराचा इतका अति वापर करतात की त्यांच्या जवळून जाताना, हे अत्तराच्या हौदातच बुडून आले असावेत असं वाटतं. अत्तराचा अति वापर इतर व्यक्तींची डोकेदुखी होऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा. काही सुगंध मुळातच सौम्य असतात. पण काही परफ्यूम खूप तीव्र असतात आणि एकदा का ते अंगावर लावले की हळूहळू आपल्या शरिराच्या गंधासोबत मिसळून ते सौम्य होतात. मात्र सगळेच परफ्युम असे सौम्य होत नाहीत म्हणून परफ्युम निवडताना काळजीपूर्वक निवडावा.

जेव्हापासून डिओडरंट स्वस्त दरात मिळू लागलेत, तेव्हापासून तरूणवर्गामधे त्याचा चांगलाच खप वाढला आहे. शे-दीडशे रूपयांना मिळणारी परफ्युमची बाटली कुणालाही सहज परवडण्यासारखी असते. शिवाय एक ते दीड महिना चालते. आणखी काय हवं? पण भरमसाठ किंमत असलेली उंची अत्तरं खरेदी करणारी लोकंही कमी नाहीत. सर्वसाधारणपणे २५० मि.लि. इतका द्राव असलेली बाटली सुद्धा दोन ते पाच हजारांपर्यंत, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त किंमतीला विकली जाऊ शकते. लोकांना असलेली सुगंधाची आवड आणि विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय, या दोन गोष्टी सुगंध विक्रेत्यांनी अचूक हेरल्या. आता ब-याच नामवंत व्यक्तींच्या नावाने उपलब्ध असलेले परफ्युमही मोठ्या प्रमाणावर विकले जातात. अमिताभ बच्चनच्या नावाचा परफ्युम हे त्यातलंच एक उदाहरण. मात्र परफ्युम कुणाला भेट म्हणून देणार असाल तर जपून! न जाणो त्या व्यक्तीचा गैरसमज व्हायचा की त्यांच्या घामाचा दर्प तुम्हाला असह्य होतोय, म्हणून तुम्ही त्यांना ही भेट देत आहात.

मध्यंतरी सेंटेड इंकची पेन्स वापरण्याची लाट आली होती. पूर्वी प्रेमवीर पत्र लिहिल्यानंतर, ते सुगंधी व्हावं म्हणून त्यावर अत्तराचा हलकासा शिडकावा करून पत्र पाठवायचे. आता तर ह्या सेंटेड शाई सोबत सुगंधी कागदही मिळू लागलेत. म्हणजे या प्रेमविरांना केवढी मदत! गेल्याच वर्षी मला सुगंधी कागद वापरून बनवलेली एक लग्नाची पत्रिका आली होती. तो सुगंध इतका छान होता की मी ती पत्रिका बरेच महिने जपून ठेवली होती. पाच-सहा महिन्यांनंतरही तो सुगंध जसाच्या तसा होता.

प्रेम आणि सुगंध यांचं जवळचं नातंच आहे म्हणा ना! रुसलेल्या प्रेयसीला खुलवण्यासाठी सुंगंधी फुलं भेट म्हणून देणारा प्रियकर कुणाला आवडणार नाही? रोमॅंटीक वातावरणात रंग भरण्यासाठी आकर्षक रंगाच्या व आकाराच्या मेणबत्त्यांचा वापर सर्रास होतो. आता तर या मेणबत्याही सुवासिक बनल्यात. मगाशी मी सुवासिक साबणाचा उल्लेख केला होता. खास दिवाळीच्या वेळी बाजारात उटण्यासोबतच बरेच सुगंधी साबणही येतात. मोती साबण तर इतका लोकप्रिय झाला होता की दिवाळी आली म्हणजे मोती साबण खरेदी करायचाच असं मध्यमवर्गीय लोकांचं मत होतं. पूजा अर्चेसाठी लागणा-या अगरबत्त्यांच्या सुगंधामधेही वैविध्य असतंच. अगरबत्त्यांचा दीर्घकाळ दरवळणारा सुगंध सर्व वातावरणच बदलून टाकतो. अरोमा ऑईल हा एक प्रकार हल्ली फार लोकप्रिय झाला आहे. शरीराच्या मसाजसाठी स्पामधे अरोमा ऑईलचा वापर आवर्जून केला जातो. आंघोळीच्या पाण्यातही ह्या तेलाचा एखादा थेंब खूप छान सुगंध देऊन जातो.

सुगंध, अत्तर, कलोन, डिओ, स्प्रे, परफ्युम, खुशबू, परिमळ... काहीही म्हणा! ज्याला सुवासाचं वेड नाही, असा माणूस विरळाच. बालपणापासून असलेली ही सुगंधाची सोबत आपल्या जीवनाच्या अंतिम प्रवासापर्यंत कायम असते. संपूर्ण जगामधे दर चौथ्या सेकंदाला एक परफ्युमची बाटली विकली जाते, असं म्हणतात. यावरूनच कळतं की सुवासाने आपलं एकूण जगच व्यापून टाकलंय.

पुढे वाचा;...

13 तुमचा मित्र

कधी स्वत:चाचा शोध घ्यायचा असं ठरवलं, तर आपल्याकडे कितीतरी कल्पना, विचारांचा, कलेचा साठा आहे, हे लक्षात येतं. कामाचा व्याप म्हणा किंवा रोजच्या जीवनशैलीमुळे म्हणा आपल्याला स्वत:शीच संवाद करायला सवड मिळत नाही. कधी जर वेळ मिळाला, तर स्वत:मधेच इतके शोध लागतात की आपण असेही आहोत, हे आपल्यालासुद्धा नव्याने कळतं. हे असं होण्याचं कारण म्हणजे चाकोरीबद्ध जीवन जगण्याची आपल्याला सवय झालेली असते. झापडं लावलेल्या घोड्याला जसं डाव्या-उजव्या बाजूचं काही दिसत नसतं, तसंच काहीसं आपलं होतं. एकच एक लक्ष्य ठेवून नुसतं आपलं धावायचं.

या धावण्याच्या नादात नवीन कल्पना, नवीन विचार यांचं स्वागत करताना मन आधी नकारघंटाच वाजवतं. मग हळूहळू स्विकार केला जातो. आस्वाद घेणं दूरच राहिलं, आपल्याला ह्या नवीन कल्पनेबद्दल काही कळतच नसतं. चाकोरीबद्ध जीवनाचा हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. समजा, आपण जसं वागतोय, त्याच्या अगदी विरूद्ध नाही पण थोडंसं वेगळं वागलं तर? कितीतरी अवघड प्रश्नांची उत्तरं सहज मिळून जातात.

कधीतरी अगदी सहज जसे आरशासमोर उभे रहातो तसंच उभं राहून स्वत:कडे नीट पाहिलं, तर आपल्याआतमधील खरीखुरी व्यक्तीच आपल्याकडे पहात आहे असं वाटतं. हीच ती व्यक्ती जिला तुम्ही शोधत असता.

कदाचित तुम्हाला गायक व्हायचं होतं पण इतक्या लहान वयात नोकरी करायला सुरूवात केली की तुमचं स्वप्न कधी पूर्णच झालं नाही. टी.व्ही. वरचं सारेगमप पहाताना तुम्हाला तुमचं स्वप्न आठवतं. ठीक आहे, नाही जमलं तुम्हाला गायक व्हायला पण बाथरूममधेही गाऊ नका, असं कुणी सांगितलंय का?

कदाचित तुम्हाला चित्रकार व्हायचं होतं पण वडीलांचा व्यवसाय सांभाळताना तुम्हाला या आवडीला मुरड घालावी लागली. आर्ट गॅलरीतलं प्रदर्शन पहाताना, नकळत तुमच्या तोंडून सुस्कारा बाहेर पडतो. सगळ्यांना सगळंच मिळतं असं नाही. तुमच्या घरच्या बाल्कनीत तुम्ही स्वत: काढलेलं एखादं चित्र नक्कीच लावू शकता. हो ना?

तुमच्या आत असलेला तुमचा मित्र कुठेही बाहेर सुटीवर गेलेला नसतो. तो नेहमीच तुमच्या सोबत असतो आणि तुमच्या सोबतीची अपेक्षा करत असतो. तुम्ही फक्त त्याच्या खांद्यावर हात ठेवायची गरज आहे.

पुढे वाचा;...

10 सुंदर ललना

एका स्त्रीने दुस-या स्त्रीला सुंदर म्हणणं ही खूपच दुर्मिळ गोष्ट. इतरांची उदाहरणे कशाला द्यायची, मी स्वत: माधुरी दीक्षित या मदनिकेच्या सौंदर्यद्वेष्ट्यांमधे सामिल होते. या ललनेला मी कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही पण तिचं हास्य, तिचा आवाज मला पहिल्यापासूनच आवडत गेला आणि स्त्रीसुलभ भावनेतून मी नकळत तिचा मत्सर करू लागले. तिचं सौंदर्य माझ्यासारख्याच कित्येक स्त्रियांच्या मत्सराला कारणीभूत ठरलं असेल, कुणास ठाऊक?

त्याही आधी जिच्या सौंदर्याने एक स्त्री म्हणून मला प्रभावीत केलं असेल तर ती आहे, रेखा. आवाज आणि डोळे यांची निसर्गदत्त देणगी मिळालेल्या या अभिनेत्रीच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या पुरूषांची संख्या काही कमी नाही. रेखाचं सौंदर्य मला कायम एक गूढ वाटत आलं आहे. ते गूढ तसंच रहावं या हेतूने या अभिनेत्रीची प्रत्यक्ष भेट घेण्याचा विचार मी कधीच मनावर घेतला नाही.

मी प्रत्यक्ष पाहिलेल्या अभिनेत्रींपैकी दोन अभिनेत्रींच्या सौंदर्याने मी अवाक् झाले होते. पहिल्या आहेत वस्त्रहरण नाटकात काम करणा-या संजीवनी जाधव. संजीवनींना मी प्रत्यक्ष पाहिलं ते वस्त्रहरणच्या मध्यंतरामधे. वास्तविक नाटकाच्या प्रयोगासाठी केली जाणारी रंगभूषा ही खूप गडद असते. पण त्या गडद मेक अप मधेही संजीवनी इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांनी मला माझं नाव विचारलं नि मी त्याचं उत्तर दिलं इतकंच मला आठवतं. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी लोकं येत होती, मधेच कुणीतरी चहा आणून दिला तरी माझं सगळं लक्ष त्यांच्या चेहे-यावर एकवटलेलं होतं. इतक्या भडक रंगांमध्येही ही स्त्री इतकी सुंदर कशी काय दिसू शकते, असा मला प्रश्न पडला होता. त्यांचं संजीवनी हे नाव सार्थ आहे असं मला त्यावेळी वाटून गेलं.

त्यानंतर ’हृदयी वसंत फुलताना’ हे नाटक पहाण्यासाठी मी कल्याणला गेले होते, त्यावेळेस ऐश्वर्या नारकरला अगदी हाताजवळच्या अंतरावरून पाहिलं होतं. साधा पंजाबी ड्रेस, केसांचा अंबाडा बांधलेला, स्वच्छ धुतलेला चेहेरा आणि कपाळावर ठसठशीत कुंकवची टिकली. बहुधा तिच्या नाटकाचा प्रयोग संपवून ती घरी चालली होती. तिच्या चेहे-यावर जी सोज्वळ तकाकी होती ती पाहून असं वाटलं की आजपर्यंत कुठलाच कॅमेरा ऐश्वर्याचं खरं सौंदर्य आपल्या चौकटीत बंदिस्त करू शकलेला नाही. तिच्याकडे पहाताना मला नाटक पहाण्यासाठी आत जायचंय हे विसरायला झालं.

रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अशा कित्येक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्याला वरवरच्या रंगरंगोटीची गरज नाही. आपल्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या चेहे-यावर उमटतं असं म्हणतात. या अभिनेत्रींचं सौंदर्य खुलवण्यामधे त्यांच्या सुंदर विचारांचाच तर वाटा नसेल ना?

पुढे वाचा;...

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP