अक्षरांचा आकार कमी जास्त करा.

मराठी टंकलेखनचा पर्याय याच पानाच्या शेवटी उपलब्ध आहे.

8 ट्वेन्टी वन - मोजूनमापून जुगार

बेन कॅम्पबेल हा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी आहे. बोस्टनला रहाणा-या या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की स्वत:च्या बळावर हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायन्सची शिष्यवृत्ती मिळवून डॉक्टर व्हायचं. ३ मिलियन डॉलर्सची आवश्यकता असते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या बेनला साहजिकच हे शक्य नसतं. इतके पैसे गोळा करता करता आपल्याला चार-पाच वर्षं तरी सहज लागतीलच ही चिंता सतत त्याचं मन खात असते.

बेन त्याच्या इतर दोन मित्रांसमवेत एक छोटं स्वयंचलीत चाक तयार करण्याच्या प्रोजेक्टवरही काम करत असतो पण या गोष्टीचाही उपयोग त्याला शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी होत नाही. पैसे कसे मिळवावेत याचा विचार करतच बेन गणिताच्या वर्गात बसलेला असतो. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर दिलेल्या व्यावहारीक उत्तराने तो प्राचार्य मिकी रोसा यांचं मन जिंकतो. पण प्राचार्य मिकी यांना बेनच्या बुद्धीमत्तेचा वापर वेगळ्याच कारणासाठी करायचा असतो.

एके दिवशी बेन लायब्ररीमधे आपला अभ्यास करत असताना, त्याला एक मुलगा आपल्या मागोमाग यायला सांगतो. बेन त्याच्या मागोमाग जिथे पोहोचतो तिथे प्राचार्य मिकी रोसा हे काही खास व्यक्तींबरोबर उपस्थित असतात. प्राचार्यांकडून बेनला कळतं की जर व्यवस्थित डोकं वापरलं तर जुगार खेळताना नेमकं कोणत्या पानावर पैसे लावून जिंकावं, हे आपण स्वत:च ठरवू शकतो. एकदा का पत्ते ओळखण्याचं कौशल्य आत्मसात केलं की दर आठवड्याच्या सुटीला लास वेगासला जायचं आणि मोठी बाजी मारून पैसे मिळवायचे असा मिकिचा बेत असतो. या कामी प्राचार्य मिकी त्याला आपल्या टीममधे सामील करून घेण्यास उत्सुक असतात. मिकीचं हे खरं रूप पाहून बेन हडबडतो. मिकीची ऑफर धुडकावून लावतो. पण जर डॉक्टर व्हायचं असेल, तर आपल्याला याच मार्गाने झटपट पैसे मिळू शकतात, हे त्याला लक्षात आल्यावर तो होकार देतो. मिकी त्याला पत्ते कसे ओळखायचे हे शिकवतो. लवकरच बेन या कौशल्यात पारंगत होतो. मिकीच्या टीममधील इतर मुलं-मुली त्याचे चांगले मित्र होतात. जिलशी तर त्याचे विशेष संबंध जुळतात.

दर आठवड्याच्या सुटीला लास वेगासला जाऊन पैसे मिळवणं हा तर बेनचा छंदच बनतो. त्याच्या अपेक्षेपेक्षाही जास्त पैसे त्याने मिळवलेले असतात पण त्याला अशा प्रकारे जुगार जिंकण्याची चटक लागते. जिलसोबत मस्त आयुष्य जगताना तो आपल्याला काय करायचं होतं हेही विसरून जातो. एक दिवस असा उगवतो जेव्हा बेन जुगार खेळताना प्रा. मिकीने दिलेला सल्ला विसरतो. ’जुगार हा भावनेने नाही डोक्याने खेळायचा असतो’. बेन हा सल्ला विसरतो. मिकी आणि बेनमधे वाद होतात. परिणामी मिकी त्याला आपल्या टीममधून बाहेर काढतो आणि त्यानंतर बेनला आपला आयुष्यातील सर्वात मोठा जुगार खेळावा लागतो.

मदिरा, मदनिका आणि माया यांच्या मोहजालातून बाहेर पडणं तसं कठीणच. जितकं जवळून यांना पहावं तितका मोहाचा पाश घट्टच आवळला जातो. यातून जो बाहेर पडला तो निभावला नाहीतर अंताच्या दिशेने त्याची वाटचाल केव्हा सुरू होते, हे त्याला कळतंही नाही. पण बाहेर पडणंही वाटतं तितकं सोपं नसतं. भावनाहीन होऊन जो यात स्वत:ला गुरफटून घेऊ शकतो, त्यालाच मोहाचे हे पाश तोडून मोकळा श्वास घेणं शक्य असतं. कुठे थांबायचं हे ज्याला माहित असेल, त्याला असा मोजून मापून जुगार खेळणं अशक्य नाही पण त्याचवेळी आपल्या अशा खेळाकडे कुणाचं लक्ष तर नाही ना, हेही पहाणं तितकंच महत्त्वाचं असतं.

8 अभिप्राय:

kayvatelte Friday, February 26, 2010  

अगदी वेळ पाहुन टाकली ही पोस्ट.. बच्चनच्या सिनेमातली हवाच काढुन टाकली तुम्ही..
मस्त आहे, पाहिलेला नाही, पण जर ऑन लाइन असलेली सिनेमाची लिंक दिली तर सिनेमा पहाता येइल..

कांचन कराई Friday, February 26, 2010  

हा, हा, हा! तुम्ही म्हटलंत त्यातलं अर्ध खरं आहे. पण ही पोस्ट स्पॉयलर पोस्ट नक्कीच नाही. बच्चनचा चित्रपट पहातानाही तशीच मजा येईल. अर्थात हेदेखील हिंदी चित्रपट कसा बनवला आहे, यावर अवलंबून आहे. मी हा चित्रपट कालच पाहिला.

भानस Friday, February 26, 2010  

कांचन, हा सिनेमा आल्या आल्याच आम्ही पाहिला होता. अगदी खरेयं, एकदा का या चक्रात तुम्ही अडकलात की त्यातून सुटका नाही. येथे प्रोफेशनल पोकर प्लेअर्स बरेच आहेत. एक अगदी ओळखीतला,खूपच यशस्वी. पण घरात कोणालाही त्याचे हे प्रोफेशन अजिबात आवडत नाही. म्हणजे बघ.
अरे! मला माहितच नव्हते की बच्चनचा चित्रपट येतोय ते. मी बच्चन पंखा त्यामुळे पाहिनच, :) आशा आहे सिनेमाची वाट लावणार नाहित.

हेरंब Friday, February 26, 2010  

वा कांचन. मी मागे म्हणालो तेच पुन्हा सांगतो. तुझी चित्रपटांची निवड एकदम मस्त असते. 21 खरंच अप्रतिम चित्रपट आहे. शेवट जरा कंटाळवाणा वाटला.. पण overall effect जबरीच. मला या चित्रपटात Kevin Spacey जाम आवडला.

कांचन कराई Saturday, February 27, 2010  

भाग्यश्री,
अगं मला तर हे माहितच नव्हतं की काही लोक हे प्रोफेशनली खेळतात. मला वाटायचं असंच आपला टाईमपास! अशा मार्गाने पैसा मिळाला तर तो हवासा वाटूनही आपल्याला नकोच असतो. बच्चनचा चित्रपट आलाय, तो याच चित्रपटाची नक्कल आहे की नाही, हे नक्की मलाही माहित नाही पण जर असेल तर असाच चांगला असावा अशी मीही आशा करते. वातावरण देशी करण्याच्या नादात चित्रपट फसायला नको.

कांचन कराई Saturday, February 27, 2010  

माझी चित्रपटांची आवड चांगली असली तरी मी गेल्या आठवड्यापर्यंत एकही हॅरी पॉटर पाहिला नव्हता, यावर तुझा विश्वास बसेल का हेरंब? शिवाय "मला लॉर्ड ऑफ द रिंग्ज खूप लांबलचक वाटले", असं म्हटलं की लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालतात. आता नाही आवडला, तर काय करू? असो.

शेवट लांबल्यामुळेच 21 थोडा कंटाळवाणा होतो पण शेवट खूप छान आहे.

हेरंब Saturday, February 27, 2010  

सेम पिंच. मला पहिला भाग सोडला तर एकही हॅरी पॉटर आवडला नाही. आणि fairy tale/ sci-fi ची विशेष आवड नसल्याने मी तर LOTR बघितला पण नाहीये. मला इव्हन matrix पण विशेष आवडला नाही (आणि असं जेव्हा जेव्हा मी म्हणतो तेव्हा लोक मला वेड्यात काढतात नेहमी. पण इलाज नाही..) :-)

कांचन कराई Saturday, February 27, 2010  

मी मेट्रीक्स जेमतेम अर्धा पाहिला. डोक्यावरून गेला, त्यामुळे परत त्याच्या नादीच नाही लागले.

Post a Comment

मराठीत टंकलेखन करा.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP